"जगण्याचा अन खर्च करण्याचा नवा अर्थ शिकवणारी बोधकथा"....

जास्त कपडे धुवायला काढू नका', तिने म्हटले.
का बरे? तो म्हणाला.
'नाही, आपली काम वाली बाई २ दिवस येणार नाही'.
कशासाठी?
'गणपतीसाठी २ दिवस नातवाला भेटायला मुलीकडे जाणार आहे, असे बोलली'.
'ठीक आहे, नाही काढत जास्त कपडे धुवायला',
'आणि, हो, तिला गणपतीसाठी ५०० रुपये देते, सणासाठी बोनस म्हणून'.
'कशाला, आता दिवाळी आलीच, तेव्हा देऊया',.
'नाही रे, गरीब बाई ती, हौशेने नातवाकडे जातेय तर तिलाही बरे वाटेल', अन ह्या महागाई मध्ये त्यांच्या पगारात कसा सण साजरा करणार ते'?
'तू ना, खूपच भावनिक होतेस',
'नाही रे, काळजी करू नकोस', मी आजचा पिझ्झा खाण्याचा बेत रद्द करते', सहज ५०० रुपये उडतील त्या ८ पावाच्या तुकड्यामागे', ती हसत बोलली.
'वा वा, फार छान, तू पण शहाणी आहेस', आपल्या तोंडचा पिझ्झा तिच्या ताटात'.
३ दिवसानंतर
'काय मावशी, कशी झाली सुट्टी', त्याने कामवाल्या मावशीला विचारले.
'खूप छान झाली', ताईने ५०० रुपये दिले होते मला, सणाचा बोनस म्हणून',.
'मग जाऊन आली का नातवाकडे'?
'हो जाऊन आली, मस्त ५०० रुपये खर्च केले २ दिवसात'.
'म्हणजे काय केल नेमकं'?
'नातवासाठी बाजारातून १५० रुपयाचा ड्रेस घेतला अन ४० रुपयाची बाहुली, मुलीला छानपैकी ५० रुपयाचे पेढे घेतले, ५० रुपयाचा मंदिरात नैवद्य दिला, 60 रुपये रिक्षाभाडे, २५ रुपयाच्या मुलीला बांगड्या घेतल्या, ५० रुपयाचा जावईबापूसाठी बेल्ट अन उरलेले ७५ रुपये नातवाच्या हातात दिले'. तिने झाडू मारता मारता तत्काळ खर्च मांडला.
'५०० रुपयात इतके काही', तो आश्चर्याने म्हणाला अन विचार करू लागला.
त्याच्या डोळ्यासमोर ८ तुकडे केलेला पिझ्झा उभा राहिला. तो एकटक कल्पनेतल्या पिझ्झाकडे पाहू लागला. एक एक तुकडा त्याच्या डोळ्यामध्ये घुसू लागला. त्या एक एक पिझ्झाच्या तुकड्याशी तो कामवाल्या बाईच्या सणावरील खर्चाशी तुलना करू लागला.
पहिला तुकडा नातवाच्या ड्रेसचा, दुसरा पेढ्याचा, तिसरा तुकडा मंदिरातील नैवद्य, चौथा रिक्षाभाडे, पाचवा बाहुलीचा, सहावा मुलीच्या बांगड्याचा, सातवा तुकडा जावईबापूचा बेल्ट अन आठवा तुकडा नातवाच्या खाऊसाठी पैसे.
पिझ्झा त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागला, एका तुकड्या मागे दुसरा तुकडा, अन तुकड्यावरील ड्रेस, बांगड्या अन तिचा सण.....
एका पिझ्झ्याची त्याला दुसरी बाजू आज दिसली होती. पिझ्झ्याचे ८ तुकडे त्याला काही शिकवून गेले होते, जगण्याचा अन खर्च करण्याचा नवीन अर्थ.

Comments

  1. Kharach mitra khup chaan. Life is nothing but caring and sharing happiness.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....