तेवढेच शुद्ध तेवढेच सात्विक - भाग १

गेल्या वर्षी विजयादशमीला नागपूर जाण्याचा योग आला. मा. मनमोहनजींना(मनमोहनजी वैद्य, संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख) भेटण्यासाठी वेळ मागितला होता तेव्हा, "नागपूरला ये , तेथे निवांत भेटता येईल." असे मनमोहनजी म्हटल्यामुळे नागपूर जाणे पक्के झाले. विजयादशमीला नागपूर जाणे म्हणजेच रेशीमबागेतला उत्सव पहायला मिळणार, आणि  रेशीमबागेतला विजयादशमी  उत्सव बघण्याचा योग काय असतो, ते संघ स्वयंसेवक असल्याशिवाय कळणे महाकठीण ...! तरी देखील थोडे समजविण्याचा प्रयत्न करतो. संघाची सुरुवात  नागपूर पासून झालीये, त्यामुळे तेथील संघकाम, प्रत्यक्ष पूजनीय डॉ. हेडगेवारांसोबत काम केलेले अनेक कार्यकर्ते असणारे नगर म्हणजेच नागपूर, थोडक्यात 'संघाची पंढरीच'. अश्या ठिकाणाचा संघ स्थापना दिनाचा उत्सव बघणे म्हणजेच, मन आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेच्या तिरी न्हाऊन निघण्यासारखेच असते स्वयंसेवकांसाठी. त्यामुळेच नागपूर जाण्याची मनात Excitement होतीच.

   तेथे मनमोहनजी शिवाय माझी कुणाशीच ओळख नाही, ही बाब स्वतः मनमोहनजी जाणून असल्यामुळे, माझी सकाळी थांबण्याची व्यवस्था, स्टेशन जवळ घर असलेल्या एका कार्यकर्त्यांकडे करण्यात आली. ( जेणे करून लवकर तयार होऊन ८:०० पर्यंत उत्सव स्थानी पोहोचता यावे.) सकाळी बरोबर ६:३० ला आठवले काका मला अजनी स्टेशनवर आपल्या घरी न्यायला आलेत. काकांचं वय सत्तरीच्या आसपास असावं, परंतु त्यांची तत्परता, अचुक वेळ पाळण्याची वृत्ती आणि ऊर्जा माझ्या सारख्या तरुणाला देखील लाजवणारी होती. आठवले काकांच्या घरून तयार होऊन तथा चहापान संपवून आम्ही रेशीमबागेकडे प्रस्थान केले. नागपूर महानगराचे संचलन संपले होते व उत्सव सुरु व्हायला २५ मिनिटे अवकाश होता. गणवेशात असूनही मी प्रेक्षकांत बसण्याची माझी ही तशी पहिलीच वेळ होती, त्यामुळे थोडे अवघडल्या सारखे वाटत होते. आता थोड्या वेळात पूजनीय सरसंघचालकांचे उदबोधन प्रत्यक्ष ऐकायला मिळणार हा विचारच मनाला विलक्षण आनंद देत होता. दरवर्षी हा कार्यक्रम मी T.V.  अथवा Youtube वर पाहत असतो, आणि या वर्षी मी स्वतः त्या कार्यक्रमाचा भाग बनत होतो.  ही एक आनंददायी  बाबाच होती माझ्यासाठी.   

   कार्यक्रम स्थानी जैन, बौद्ध संतांची टोळी प्रमुख अतिथींच्या पंडळात बसली होती. संघाचे केंद्रीय अधिकारीही तेथेच बसले होते, अर्थातच मनमोहनजी देखील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व त्यांचे अनेक साथीदार तसेच अनेक राष्ट्रीय वाहिन्यांचे पत्रकार ही उपस्थित होते. पूजनीय सरसंघचालकांचे आगमन झाले व कार्यक्रमाला सुरुवात झाली. दंड, नियुद्ध, योगासन, व्यायाम योग यांची प्रात्यक्षिकं मन चेतवणारी होती. घोषाच्या प्रात्यक्षिकाने बघणार्यांच्या डोळ्याचे पारणेच फेडले. (प्रात्यक्षिक म्हणजे दैनंदिन शाखेवरील कार्यक्रमांचे सामूहिक प्रदर्शन) त्यानंतर सरसंघचालकांचे उदबोधन (भाषण) व कार्यक्रम संपला.  मग मा. मनमोहनजींना Call करून भेटायची जागा विचारून तेथे गेलो असता मैदानावरील खूप साऱ्या गर्दीमुळे आमची चुकामुक  झाली. इकडे आठवले काकांकडे परत येईस्तोवर तेही दिसेनासे झालेत. ठरल्याप्रमाणे आठवले काकांच्या घरी परत जाऊन तेथून मनमोहजींच्या घरी जायचे होते. मात्र मैदानावरील गर्दीने सगळा गोंधळ उडवला. काकांकडे फोन ही नसल्यामुळे माझी जास्तच पंचाईत झाली. Parking च्या दिशेने शोध घेत गेलो असता लक्षात आले कि गाडी देखील गेलीये. या सगळ्यांत १५ -  २० मिनिटे गेल्यामुळे कदाचित आठवले काका वाट बघून  निघाले असावेत. झालं ...! साराच गोंधळ ...! मग मनमोहनजींना फोन वर सगळा प्रकार सांगितला  असता, त्यांनीच मला त्यांच्यासोबत महाल कार्यालयात नेले.  महाल कार्यालय म्हणजे संघाचे केंद्रीय मुख्यालय. डॉ. हेडगेवारांनी स्वतः पडकी जागा स्वच्छ करून पहिली संघशाखा सुरु केलेला तोच मोहिते वाडा. wow..!! "महाल कार्यालयात सोबत चल" असे ऐकताच माझ्या मनात आलेला हा विचार . थोड्या वेळापूर्वी चुकामुकीने गोंधळलेला मी, आता पुन्हा Excitement च्या घोड्यावर स्वार झालो होतो.

   महाल कार्यालयात मी, मनमोहनजी व नंदकुमारजी दाखल झालो. केंद्रीय कार्यकर्त्यांच्या एक खोलीत (जेथे मनमोहनजींचा निवास असतो) आम्ही थांबलो.  मनमोहनजींना आपला सामान घेऊन  मग  आम्ही त्यांच्या  घरी निघणार होतोच, तेवढ्यात त्या खोलीत पू. सरसंघचालक दाखल झालेत. तो माझ्यासाठी एक विलक्षण क्षण होता. त्यांना बघताच मी जागेवर उठून उभा राहिलो, ते सोफ्यावर बसल्यावर मी ही बसलो. मनमोहनजींनी माझा परिचय पू. सरसंघचालकांना करून दिला. परिचयात माझ्या गावाचे म्हणजेच मी तळोद्याचा असल्याचा उल्लेख करताच, मी त्यांना Correct करून नंदुरबार जिह्ल्याचा आहे, असे सांगितले (साधारणतः तळोदा छोटे गाव असल्यामुळे नेमके लक्षात येत नाही. म्हणून मी नेहमी जिल्हास्थानाचा उल्लेख करतो. )  परंतू पुढचा धक्का तेव्हा बसला जेव्हा मोहनजी "मला तळोदा माहित आहे अरे.." असे म्हटलेत. त्यानंतर आम्ही त्यांच्या एका जळगाव प्रवासात २०१० मध्ये भेटलो असल्याचे त्यांनीच मला सांगितले. तेव्हा मात्र मी थक्कच झालो. एका वर्षातून सरसंघचालकांचे ३-४ वेळा भारत भ्रमण होत असावे, रोज अनेकांशी भेटी, चर्चा, बैठका असे अनेक विषय असताना देखील ६ वर्षांपूर्वी भेटलेल्या एका Ground Level च्या कार्यकर्त्याच्या एका सहज भेटीचे स्मरण त्यांना राहावे ! ही बाब त्यांच्या  व्यक्तिमत्वाची प्रचिती देते.

   संघात सरसंघचालक, केंद्रीय, प्रांतीय अधिकारी वा शाखा स्तरावरील कार्यकर्ता अशी सर्व रचना केवळ कामाच्या उभारणी करिता आहे, बाकी सर्वांची ओळख केवळ स्वयंसेवक अशीच. आणि हेच खऱ्या अर्थाने Secret of the RSS असावे. म्हणूनच तर जगातल्या सर्वात मोठ्या स्वयंसेवी संगठनेच्या प्रमुखाला, सामान्य स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला किती सहजगत्या भेटता येते ! याचीच अनुभूती तेव्हा मी घेत होतो. पू. सरसंघचालकांशी माझी ही दुसरी भेट होती. परंतू प्रथमच आम्ही एवढ्या कमी गर्दीत आणि निवांत भेटलो होतो. याचे सगळे श्रेय मा. मनमोहनजींना तसेच देवाला जाते. कारण दैवी कृपेनेच माझी रेशीमबागेच्या मैदानावर चुकामुक घडली होती. "जो होता है वो भले के लिये ही होता है" या वाक्प्रचाराची प्रचिती घेताना मनात विचार आला की, संघात जेवढी सहजता आणि आत्मीयता आहे तशी इतर अनुभवायला मिळणे अवघड असते. जी लोकं संघाला दुरूनच बघून आपला (गैर)समज करून बसलेले असतात, त्यांनी त्या क्षणाला माझ्या जवळ असायला हवे होते, ऐसेच वाटत होते. पू. सरसंघचालकांची  ती प्रतिभा, आत्मीयतेने विचारपूस करण्याची पद्धत, व अचाट स्मरणशक्ती या सर्वांची अनुभूती घेऊन मन भारावून गेले होते.

   लहानपणी शाखेत एक अमृतवचन शिकलो होतो 'संघ म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नव्हे, तर आचरणात आणण्याची जीवन पद्धती आहे' त्याची प्रचिती अनेक कार्यकर्त्यांकडून घेतलेली होती, तीच त्या दिवशी पू. सरसंघचालकांच्या त्या आत्मीयतेतून घेत असताना एका संघ गीताची ओळ सारखी आठवत होती "शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है ..."


- हर्षल कंसारा

पुढील भागात त्यानंतरच्या पुढच्या दिवशी अजून एका महान विभूतींच्या (श्री. मा. गो. वैद्य) भेटीची अनुभूती लिहीन.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....