प्रश्न केवळ मंदिराचा नाही, खरा प्रश्न आमच्या आदर्शांचा


अनेक वेळेला राम मंदिराच्या मुद्द्यावर चर्चा ऐकली आहे. "मंदिर तेथेच बनले पाहिजे", पासून तर, "छे छे मंदिराने कुणाच्या ताटात भाकरी येणार का? मग कशाला त्याच्या भानगडीत पडायचे," इथपर्यंतचे सर्व तत्वज्ञान ऐकायला मिळते. परंतु मूळ प्रश्न शिल्लक राहून जातो तो म्हणजे, आपल्या आदर्शांचा....

मंदिराचा आणि आदर्शांचा काय संबंध? असा देखील प्रश्न कुणाला पडू शकेल. परंतु असा प्रश्न निर्माण होणे म्हणजेच या देशाच्या मूळ आदर्शापासून थोडे अंतर बाळगण्यासारखे आहे. म्हणजे, मी जेव्हा जेव्हा शिवरायांचा पुतळा पाहतो तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, त्यांच्या गड-किल्ल्यांवर गेल्यानंतर मनात हिंदवी स्वराज्यासारखे देशासाठी कालानुरूप काहीतरी करण्याचा विचार स्पर्श करून जातो. मी शिवरायांचे चरित्र पुस्तकात वाचले आहे, त्यांच्या सगळ्या कथा मला तोंडपाठ आहेत, त्यांच्यावर आधारित मालिका, नाटक, डॉक्युमेंट्री सगळ्या मी पहिल्या आहेत. परंतु जेव्हा जेव्हा मी तोरणा, राजगड, रायगड, सिंहगड इत्यादी महाराजांनी निर्माण केलेल्या गड-किल्ल्यांवर जातो तेव्हा तेव्हा मला त्या पुस्तकी ज्ञानापेक्षा एक वेगळीच अनुभूती मिळते. मनातील सगळे वाईट आणि नकारात्मक विचार क्षणभरात त्या गड-कोटांच्या हवेत विरून जातात, आणि परतताना मी त्यांच्या आदर्शांची शिदोरी सोबत बांधून येतो. मनाला खूप खुप प्रसन्न वाटते, कारण मी पुस्तकात वाचलेले हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात तेथे जाऊन पाहिलेले असते. तो आदर्श माझ्या डोळ्यांसमोर उभा राहतो. त्यामुळेच गड-किल्ल्यांचे असणे हे माझ्या आयुष्यासाठी प्रेरणादायी आहे. 

शिवरायांच्या गड-किल्ल्यांच्या जागी  कुणी एखादे मोठे हॉस्पिटल बांधायला सांगू लागले, किंवा गड किल्ल्यांमुळे गरीबाच्या ताटात भाकरी येईल का म्हणून विचारायला लागले तर खरंच मला ते लॉजिकच आवडणार नाही. कारण गड-किल्ले ही, माझ्या सकट महाराष्ट्राच्या तमाम तरुणांसाठी केवळ वास्तू नाही, अथवा पर्यटनाचे स्थान नाही..!! ते तर आदर्शाचे प्रतीक आहे.. जीवन जगण्याचे स्फूर्ती स्थान आहे... देशोद्धाराची प्रेरणा आहे...

बिलकुल तसेच राम मंदिराचे देखील आहे. प्रभू श्रीरामचंद्र या देशातील प्रत्येकाच्या मनात एक आदर्श महापुरुष म्हणून प्रतिष्ठित आहेत. केवळ आपल्या वडिलांनी शद्ब दिला आहे, म्हणून मिळणाऱ्या साम्राज्याचा त्याग करून वनवास निवडावा ही कल्पनाच मनाला उच्च कोटीची प्रेरणा देऊन जाते,  आणि यातून समाज जीवनाच्या एका खऱ्या अर्थाने  सांस्कृतिक पर्वाचा प्रारंभ होत असतो, असा मोठा वारसा नशिबाने आपल्या भारतीय समाजाला मिळाला आहे. त्याचे प्रतीकात्मक स्वरूप म्हणजेच रामाच्या जन्म भूमीवर त्यांचे भव्य मंदिर हे आहे. जे शिवरायांच्या गड किल्ल्यांप्रमाणे अनेकांना आदर्श जीवन जगण्याची चिरकालीन प्रेरणा देत राहील. त्यातून असा समाज निर्माण होईल जो भ्रष्टाचार मुक्त असेल, देशभक्ती युक्त असेल, आणि संपूर्ण जगाच्या अपेक्षांवर खरा उतरून जगाच्या कल्याणासाठी निरंतर राबणारा असेल. मग आपल्यासह संपूर्ण विश्व देखील या आदर्शांची पूजा बांधेल. असे राम राज्य, हेच  प्रत्येकाचे स्वप्न आहे, आणि म्हणूनच मंदिर निर्माणाचा आग्रह आहे, असे मला वाटते.

- हर्षल कंसारा


Comments

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....