थंडीत पडलेले उबदार प्रश्नं


देशातील राजकीय पक्षाच्या प्रमुखानी मुलाखत घेण्याची आणि देण्याची हि पहिलीच वेळ असावी बहुधा. याला राजकीय परिपक्वता म्हणवी की, दोन समदु:खी माणसांची चर्चा? हा एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या फसलेल्या राजकारणामुळे सत्तेपासून लांब गेलेल्या या राजकारण्यांना थंडीच्या दिवसात जी उबदार स्वप्ने पडू लागली आहेत, ती सहजासहजी साकारली जातील, याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत.


पुण्यातील बृहन्महाराष्ट्र कॉमर्स महाविद्यालयाच्या मैदानावर काल बहुचर्चित अशी मुलाखत रंगली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. देशातील राजकीय पक्षाच्या प्रमुखानी मुलाखत घेण्याची आणि देण्याची हि पहिलीच वेळ असावी बहुधा. याला राजकीय परिपक्वता म्हणवी की, दोन समदु:खी माणसांची चर्चा? हा एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. 

महत्वाच्या प्रश्नांना बगल

महाराष्ट्राला पडलेले प्रश्न या मुलाखतीत विचारणार असे राज ठाकरे यांनी सुरुवातील जाहीर केले. मात्र मुलाखतीतील अधिक भाग हा ठाकरे कुटुंबीय, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी आणि दस्तूर खुद्द साहेबांची कारकीर्द यांभोवती फिरत राहिला. यात महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नांपैकी आरक्षण, शेतकरी आत्महत्या आणि जातीयवादाचा मुद्दा हे मांडले गेले. त्याचीही साहेबांनी खूप समाधानी उत्तरे दिली असे जाणवले नाही. शेतकरी आत्महत्या प्रश्नावर उत्तर देताना तर पवारांनी मध्येच नोटाबंदीचा मुद्दा काढून मूळ प्रश्नालाच बगल दिली, आणि नरेंद्र मोदींचा निर्णय कसा फसला हे मिश्कीलपणे सांगून जमलेल्या भक्तांच्या टाळ्या मिळवल्या. 


महाराष्ट्राला पडलेल्या आणि त्या मुलाखतीत विचारला गेलेला दुसरा प्रश्न होता तो जातीयवादाचा. महाराष्ट्रात फोफावणारा जातीयवाद हे चिंतेचे कारण आहे, असे पवारांनी सांगितले. तसेच ऑफिसमध्ये सोबत डबा खाणारे चार मित्र हे आता एकमेकांना जातीयवादी चष्म्याने पाहू लागले आहेत, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. याबद्दल या दोन्हींचे अभिनंदन. मात्र ही परिस्थिती कुणी निर्माण केली? कशी निर्माण झाली? यावर दोन्हींनी सोयीस्कररित्या मौन बाळगणे पसंत केले. कारण त्याचे मूळ या दोन्ही नेत्यांच्या राजकारणासाठी तसे घातक ठरणारे आहे. असे नसते तर खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या जातीकडे तेव्हा पवार साहेबांचे लक्ष वेधले गेले नसते. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज हे गो-ब्राम्हण प्रतिपालक नव्हते असे सांगतांना किमान त्यांची जीभ तरी अडखळली असती. बहुजन आणि अभिजन यांच्यात निर्माण झालेल्या दरीतून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम गेली अनेक वर्षे पवार साहेब करत आहेत, तेव्हा आता जातीयवादावर केवळ खंत व्यक्त करून काय उपयोग? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. 


तिसरा मुद्दा होता तो आरक्षणाचा आरक्षण हे जातीच्या आधारावर असावे की आर्थिक? यावर शरद पवारांनी दिलेली स्पष्टता आजच्या तरुणांना(कष्ट करण्याची तयारी असलेल्या) पटणारी होती. अनुसूचित जाती, जमाती वगळता इतर जातींसाठी आरक्षण हे आर्थिक आधारावरच असावे, असे त्यांनी सांगितले. यात माध्यमांचे मला कौतुक करावेसे वाटले, त्यांनी पवारांच्या विधानाला सकारात्मक रित्या घेतले. या ऐवजी सरसंघचालक मोहन भागवत असते तर कदाचित हा वादाचा मुद्दा म्हणून प्रस्तुत करण्यात आला असता. मात्र उशिरा का होईना शहाणपण दाखविल्याबद्दल माध्यमांचे अभिनंदन केले पाहिजे.  

शिळ्या कढीला ऊत

राज ठाकरे यांनी मुलाखतीत पुन्हा एकदा 'मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव' नावाच्या शिळ्या कढीला दिलेला ऊत आणि त्याला साहेबांचे अनुमोदन, ही दोन्ही नेत्यांची आपला प्रादेशिक पक्ष टिकवण्याची धडपड पुन्हा एकदा बघायला मिळाली. मला आठवते २०१४ ची विधानसभा निवडणूक असताना याच राज ठाकरे यांनी, भाजप सत्तेत आल्यास मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होईल, अशी भीती जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा सकारात्मक परिणाम तर त्यांच्या पक्षाला झाला नाहीच, तसेच गेली ३ वर्षे भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेत असून देखील मुंबई महाराष्ट्रातच आहे. हे सत्य जनता उघड्या डोळ्यांनी बघत असताना, पुन्हा तीच वल्गना करणे हास्यस्पद आणि केविलवाणे वाटते.
  

आयोजकांनी या कार्यक्रमाला सांस्कृतिक व कौटुंबिक कार्यक्रम असे नाव दिले होते खरे! मात्र यात ज्या पद्धतीने प्रश्न विचारले गेले, मुद्दे मांडण्यात आले, त्यात मोदी द्वेषाचा वास प्रत्येक कुटुंबात दरवळला हे मात्र सत्य. शेवटचा प्रश्न तर अगदी भन्नाट होता. राज की उद्धव? असा थेट प्रश्न राज ठाकरे यांनी विचारून आपल्या बुडत्या पक्षाला काही आधार मिळतोय का? हेच चाचपडून पहिले. शरद पवार आणि राज ठाकरे एकत्र आले ते याच चाचपणीसाठी, याला मिळणारा प्रतिसाद महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय दिशा ठरवेल, असा त्यांचा प्राथमिक अंदाज असावा. मात्र आपल्या फसलेल्या राजकारणामुळे सत्तेपासून लांब गेलेल्या या राजकारण्यांना थंडीच्या दिवसात जी उबदार स्वप्ने पडू लागली आहेत, ती सहजासहजी साकारली जातील, याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. ती साकार करण्याची कितीही प्रयत्न केली तरी देखील जुने प्रारब्ध या दोन्हींना आडवी जातात, आणि त्यातून जनतेचे लक्ष भरकटण्यासाठी अशा मुलाखतींचा चंग बांधावा लागतो.

- हर्षल कंसारा


Comments

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....