उठा, जागे व्हा !






                'युवक' हा शब्द कानी पडताच डोळ्यासमोर येते ते चैतन्य, उत्साह, साहस, प्रचंड कार्यक्षमता आणि उर्जा. इतिहासाची पाने चाळली असता या साहसी, उत्साही,चैतन्यदायी युवकांनीच घडविलेला क्रांतिदायी इतिहास आपणास वाचायला मिळतो. ही युवकांमध्ये असलेली ताकतच समाजाच्या उत्थानासाठीचा आशेचा किरण आहे. या युवाशक्तीमुळेच जगातील अनेक मोठे कार्य पार पडले व याच्या आभावामुळे अनेक कार्य अपुर्णच राहीली असल्याची अनेक उदाहरणे आहेत. जवळील काळातील उदाहरण घ्यायचे म्हटले तर गेल्या दोन वर्षांपुर्वी झालेली इजिप्तमधील क्रांती ही आपण सर्वांनीच पाहिली आहे. ही ऐतिहासीक  क्रांती ज्या समाजामुळे घडली त्यात तरुणांचा सक्रिय सहभाग अधिक होता व त्यामुळेच तेथील समाज अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून/हुकूमशाहीतून मुक्त होऊ शकला हे सार्या जगाने पाहीले आणि मान्य सुध्दा केले.
                आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात; तंत्रज्ञान विकसित करणे,त्यात दैनंदिन नाविण्य आणणे व त्याचा अधिकाधिक वापर हे तरुणच करतात. त्यामुळे तरुण म्हणजे नवे, नवा विचार, नविन दृष्टिकोन असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अश्या या आजच्या तरुणाईत जोश दिसतो परंतु या जोश सोबत होश नसला तर हे सारे भरकटून आणि विस्कटून जाते. म्हणून जेव्हा जेव्हा युवकांविषयी अथवा युवाशक्ती विषयी विचार केल्यास त्याला योग्य दिशा आहे का? याचा अधिक विचार केला पाहिजे.
                आजच्या भारतीय तरुणाचा विचार करता लक्षात येते की तरुणांमध्ये उत्साह भरपूर आहे, अन्यायाविरुध्द चिड आहे. मागील वर्षी झालेल्या जन लोकपाल बिलच्या आंदोलनात अण्णा हजारेंच्या समर्थनात लाखो तरुण सामिल होते, सध्या सुरु असलेल्या दिल्ली गँगरेप विरोधातील आंदोलन हे तरुणच उत्सफ़ूर्तपणे चालवित आहेत. हे सारे असले तरी सुध्दा हि आंदोलने, मोर्चे खूप यशस्वी झाली नाहीत लाखो तरुणांचा सहभाग असून देखील हे का यशस्वी होऊ शकले नाही? याचा विचार केला असता लक्षात येते की भारतीय युवकांच्या मनात आपल्या राष्ट्राविषयीची स्पष्ट कल्पनाच नाही. एखादे आंदोलन पेटले की त्यात सामिल व्हायचे, फ़ेसबुकवर त्या विरोधातील पोस्ट अपलोड करायचे, मग पुन्हा त्या आंदोलनाचे वादळ शांत झाल्यास त्यास विसरायचे परत फ़िरुन तो उर्वरित विषयही कोणी कढत नाही. आपले दैनंदिन जीवन पुन्हा जैसे थे! आपण कोण, आपला समाज कोणता, आपले राष्ट्र कोणते, हे सगळे का आणि कशासाठी करायचे याबद्दल कोणी विचार करीत नाही. मला वाटते या सर्वांची स्पष्ट कल्पना जो पर्यंत येणार नाही तोवर आंदोलन, मोर्चे, त्यासाठी लगलेली युवाशक्ती, इ. ला योग्य फ़ळ मिळणार नाही. हे सर्व जाणून घेण्यासाठी चार महत्वाच्या गोष्टिंवर आपण विचार करावा. त्या म्हणजे 'भारत को जानो', 'भारत को मानो', 'भारत के बनो' और 'भारत को बनाओ'.
भारत को जानो  :
                व्यक्तिच्या जीवनात परिचयाचे महत्व खूप  असते.  मी कोण, माझी आवड काय याबद्दलची स्पष्ट कल्पना असली तर ती व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते. तसेच भारताचे उत्थान व्हायचे असेल तर भारत काय आहे हे जाणुन घेतले पाहीजे. आज आपल्याला शिकविले जाते की भारताचा इतिहास हा गुलामगिरीचा होता. या देशात अनेक आक्रमक आलेत व त्यांनी हजारो वर्ष इथे राज्य केले, परंतू हे पूर्ण सत्य आहे काय? याची पडताळणी केली असता लक्षात येते की भारताच्या इतिहासात कोणत्याही आक्रमकांनी एकावेळेला संपूर्ण भारतावर राज्य केलेले नाही. सिकंदर सारख्या योध्द्याने भारतावर अनेक वर्षे आक्रमण करुन देखील त्याला केवळ सिंधूनदी लगतच्या प्रदेशापुढे प्रवेश करता आला नाही, जूलुमी औरंगजेबाची राजवट असताना छत्रपती शिवजी महाराजांसारख़्या योध्द्यांनी त्याविरुध्द संघर्ष केलाच की!, त्यामुळे भारताचा इतिहास गुलामगिरीचा नसून संघर्षाचा आहे,  हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आजच्या भारतीय युवकाच्या मनात हे अगदी पक्के ठासून बसले आहे की विज्ञान जगताची किरणे ही पश्चिमे कडूनच आम्हाला मिळाली आहे. या विषयाचा अभ्यास केला असता लक्षात येते की त्याआधी अनेक वैज्ञानिक शोध हे भारतात लगले आहे. याचे उत्तम उदाहरण द्यायचे म्हटले तर विद्युत अपघटनाचा शोध हा अगस्त्य नावाच्या ॠषींनी हजारो वर्षांपुर्वी लावला ज्याचा आज आपण बँटरी म्हणुन उपयोग करतो. असे अनेक शोध भारतात पुर्वीपासून वैज्ञानिकांनी लावली आहेत, अनेकांना याबद्दल माहितीही नसेल अश्या अनेक गोष्टींचा अभ्यास आपण उघड्या डोळ्यांनी केला पहिजे. तरच आपण कोण हे आपल्याला कळेल.

 भारत को मानो :
      तसा देशभक्तीचा खुपच आभाव आपल्या देशाच्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनात आढळतो. ही देशभक्ती 15 आँगस्ट आणि 26 जानेवारी शिवाय आपणास आठवत नाही. भ्रष्टाचाराविषयी सामान्य माणसात चिड आहे परंतू भ्रष्टाचाराची सुरूवात आपणच करीत असतो त्यावेळी देशाचा विचार मनात येत नाही. आपल्या मनात आपल्या देशाविषयी अपार श्रध्दा असलीच पाहीजे व ती आपल्या दैनंदिन जीवनातून व्यक्त झाली पाहिजे. मग ती रस्त्याचे सिग्नल पाळण्यापासून ते समाजातील स्त्री जातिचा आदर करण्यापर्यंत असली पाहिजे. जपान मधील प्रत्येक नागरीक हा स्वत:च्या देशाचा आदर आणि देशातील नियमांचे पालन करतो म्हणूनच जपान छोटा देश असून सुध्दा आर्थिक, तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर आहे. भारतातील प्रत्येक जाती, प्रांत, धर्मातील लोकांचे आराध्य दैवत हे भारतमाताच असले पाहिजे.
भारत के बनो :
                भारताचा इतिहास वाचून, त्याचा परिचय करुन आपणास आपले भविष्य काय हे लक्षात येते, हल्ली आमच्या युवक मित्रांना imported वस्तू वापरायला खूप आवडतात. विदेशी वस्तू म्हणजे दर्जेदार, भारतीय वस्तू म्हणजे low quality असा समज अधिक दिसतो. कुणी स्वदेशीच्या गप्पा केल्यास त्यास जुन्या विचारांचा म्हणणे, modern होण्याचा अर्थ केवळ पश्चिमात्य संस्कृतीचा अंगीकार करणे, असा वैचारिक घुसखोरीचा गोंधळ तरुणाईत माजलेला दिसतोय. परंतू या modernization युगात मानसिक शांतता ती किती आहे? भौतिक सुखासाठी एवढी साधने वापरुन सुध्दा अनेक वाईट परिणाम समोर येतात. याचे कारण एकच आहे आपण स्वत:ला आवश्यक अश्या जीवन पध्दतीचा अंगीकार करीत नाही. त्यामुळे आपले आजचे जीवन पूर्वीच्या काळापेक्षा अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. आज तंत्रज्ञान विकसीत होऊन देखील जीवनाची जटीलता आपण सोडवू शकत नाही. त्यासाठी आपली गरज ओळखुन आपल्या आवश्यकतानूसार आपण स्वदेशी म्हणजे ‘आपली व्यवस्था’ विकसीत केली पाहीजे. त्यासाठी स्वत:ला भारत होणे गरजेचे आहेस्वत:मध्ये भारत रुजविणे गरजेचे आहे.

भारत को बनाओ :
                'देश हमे देता है सब कुछ, हमभी तो कुछ देना सिखे' या तत्वाचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशात आर्थिक दरी खूप मोठी आहे. एकीकडे जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये भारतीय व्यक्तींची नावं आहेत तर दूसरीकडे 20 कोटि परिवार जे दोन वेळेचे आणि 40 कोटि परिवार हे एकावेळेचे जेवण करु शकत नाही. अश्यांसाठी सक्षम वर्गाने काम करण्याची आवश्यकता आहे. बर्याच वेळेला "मी एकटा काय करु?, माझ्या एकट्याच्या वगणूकीमुळे कोणता फ़रक पडणार आहे?" असे आपणास वाटते, परंतू आपले ज्ञान, कौशल्य, चांगले गुण दुसर्याला देणे हे आपण सहज करु शकतो असे मला वाटते. आपल्या आजू-बाजूला अनेक लहान मुले जी शाळेत जऊ शकत नाही त्यातील एक-दोघांना आपण शिकऊ शकतो. अशी अनेक छोटी-छोटी कामं करुन आपण भारताच्या उत्थानासाठी खारीचा वाटा देऊ शकतो.
"ज्यांची बाग फ़ुलून आली, त्यांनी दोन फ़ुले द्यावी
 ज्यांचे सूर जुळुन आले, त्यांनी दोन गाणी गावी
            सूर्यकुळाशी ज्यांचे नाते, त्यांनी थोडा उजेड द्यावा
            प्राक्तनाचा अंधार जिथे, प्रकाशाचा गांव न्यावा
             आभाळा एवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडे खाली यावे
             ज्यांचे जन्म मातीत मळले, त्यांना उचलून वर घ्यावे"
कविने केलेल्या वर्णनाचा आपण दैनंदिन जीवनात अंगीकार करु या. स्वामी विवेकानंद म्हणायचे "तुम्ही मला 100 तरुण द्या मी देश घडवून दख़वतो" देश घडविण्यासाठी प्रत्येकाच्या हातभाराची आवश्यकता आहे. कविवर्य रविंद्रनाथ टागोरांनी एका कवितेत म्हटले आहे की "माझ्या भारतमातेच्या पुत्रांनो तुम्ही सारे जाती, पंथ, धर्म, प्रांत, भाषा भेद सोडून भारताच्या साधनेसाठी या. भारताच्या स्वर्णिम काळाचा मंगलघट भरायचा अजून बाकी आहे, तो मंगलघट भरण्यासाठी तुम्ही हातभार लावायास जरूर जरूर या.." मला वाटते रविंद्रनाथांच्या या हाकेला साद घालण्यासाठी आज आपल्याला उठून जागे होण्याची आवश्यकता आहे.
- हर्षल कंसारा
                                                                   kansarahk@gmail.com

Comments

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....