आरोप नवे, पण तथ्य....?

आपल्या देशात स्वतःचे पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी संघ आणि हिंदुत्वाला दुय्यम, तुच्छ, किंवा धूर्त लेखणे खूपच आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला पुरोगामीत्वाच्या दुकानदारीचे लायसन्स मिळू शकत नाही. विशेषतः पत्रकारितेच्या या क्षेत्रात 'तटस्थ', किंवा 'जर्नालिझम विथ करेज' वैगरे बिरुद मिरवण्यासाठी या युक्त्या खुप्पच फायदेशीर ठरतात. तसेच या पंगतीत मानाचे स्थान पटकावण्यासाठी अनेकांची धडपड सतत सुरू असते. त्यामुळे सतत संघ आणि हिंदुत्वाला दोषींच्या पिंजऱ्यात उभे करणे महत्वाचे होऊन जाते. The most you intolerant with RSS and Hindutva, the best secular you are. अशी यांच्या मनाची भाबडी समजूत !

त्यामुळे एक विशिष्ट चौकटीतच ही मंडळी संघाला बघत असतात, अथवा बघू शकतात. आणि म्हणूनच काही विशिष्ट प्रश्नांवरच ही मंडळी खेळत असतात. उदा. आधी संघाला मुस्लिम विरोधी, ख्रिश्चन विरोधक म्हणून बडवत फिरायचे, संघविचारधारेवर असहिष्णुतेचे लेबल चिकटवायचे, आणि मात्र जेव्हा संघ संपूर्ण समाजासोबत (वैचारिक विरोधकांसह) संवाद साधण्याची नांदी करत असताना मात्र 'हे सगळे आत्ताच का?', 'खूप आधी का नाही?', 'या मागे नेमका कोणता उद्देश्य आहे?' वैगरे प्रश्नचिन्ह उपस्थित करत बसायचे. त्याउलट, संघाने आमंत्रण पाठवून देखील कार्यक्रमावर बहिष्कार घातलेल्या अति सहिष्णुतावादी विचारधारांना मात्र, का उपस्थित राहिला नाहीत? म्हणून साधा प्रश्न देखील विचारायची हिम्मत होत नाही. हेच यांचे 'जर्नालिझम विथ करेज' वैगरे असते.


अशी मंडळी भाषा आणि शब्दांची कुबेर संपदा प्राप्त झालेली असली, तरी देखील वैचारिक दिवळखोरच ठरत असते. या निर्बुद्धांना संपूर्ण जग आपल्यासारखे असल्याचे भासत असते. सूर नवे, पण पद्य .....? या अग्रलेखात लोकसत्ताच्या थोर विद्वान आणि हिम्मतवान संपादकांनी नसलेली वाक्ये देखील सरसंघाचालकांच्या तोंडात कोंबायचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यावर नामुष्की ओढावण्याची वेळ आलेली आहे. अग्रलेख मागे घेण्याचा पुरता अनुभव असलेल्यांना त्याची सवयच आहे म्हणा..!


अशा वेळी मराठीतील सुप्रसिद्ध म्हण, 'अती शहाणा, त्याचा बैल रिकामा' याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. याच अग्रलेखात काही प्रश्न देखील उपस्थित केले गेले आहेत, की 'या आधी एकेकट्यास गाठून दीक्षा देणे ही संघाची कार्यपद्धती आहे.' वैगरे. हे जर का खरे मानले तर मग 2012 साली सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी लोकसत्ताला दिलेली जाहीर मुलाखत कशाचा भाग होता? त्यास कुबेरांना एकटे गाठून संमोहित करण्याचा संघाचा कावा म्हणणार का? मला वाटते तथ्याच्या आधारावर मत मांडणे, आणि केवळ विरोधासाठी विरोध करणे, वेगवेगळे असते. 


संघाची कार्यपद्धती नेहमीच संवादाची राहिली आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासूनच संघसंस्थापक डॉ. हेडगेवार तत्कालीन मंडळींशी संघकामा विषयी नेहमीच चर्चा करत. वर्धा येथे त्यांनी दस्तुर खुद्द महात्मा गांधी यांच्याशी संवाद साधला होता, भारतरत्न आणि माजी काँग्रेसाध्यक्ष पंडित मदनमोहन मालवीय, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादी अनेकांशी संघकार्याविषयी चर्चा केली आहेच. द्वितीय सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजींना जेव्हा 1948 साली महात्मा गांधींच्या हत्येविषयी कळले त्यावेळी ते चेन्नईत प्रबुद्ध नागरिकांच्या एका चर्चासत्राला संबोधित करत होते. तृतीय सरसंघाचालक बाळासाहेब देवरस यांची समरसता या विषयाची पुण्यातील वसंत व्याख्यानमाला येथे केलेली चर्चा सर्वश्रुत आहे. त्याच पंक्तीतील 17-19 सप्टेंबर 2018 चे हे तीन दिवसीय भाषण आहे. यात फरक केवळ एवढाच की यावेळी संघाने मोठ्या व्याप्तीने आणि खोलीने हा विषय सलग तीन दिवस मांडला. मुक्त माध्यमांचा प्रभावी वापर करून तो अनेकांपर्यंत पोहोचवला आहे. 


त्यामुळे चर्चा, संवाद संघासाठी नवा विषय नाही. परंतु दरवेळी प्रमाणे देखील यावेळीही अविवेकीपणामुळे काही मंडळींनी माती खाण्याचा आपला उपक्रम सुरूच ठेवला आहे. आपल्या कथित पुरोगामीत्वाचा झेंडा मिरवण्याच्या आततायीपणामुळे धादांत खोटे आरोप केले आहेत. त्यांना नवनवे आरोप करायचा अधिकार निश्चितच आहे. पण आरोप केवळ नवे असून चालणार नाही, त्यात तथ्य देखील असले पाहिजे, नाहीतर समाजाची विश्वासार्हता गमवायला वेळ लागत नाही.


- हर्षल कंसारा


Comments

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....