आठवणीतले वडाळकर बाबा ….




आज अनेक दिवसांनी काहीतरी लिहायची इच्छा होत आहे. विषय देखील तसाच आहे. वडाळकर सर गेल्याची बातमी ऐकली, मनाला जणू चटका बसल्यासारखे वाटले. काही व्यक्ती अश्या असतात कि ज्यांच्या केवळ असण्याने सुद्धा प्रेरणा मिळत असते, प्रत्येक वेळी संवादाची आवश्यकता असतेच असे नाही. माझ्यासाठी असेच एक व्यक्तिमत्व वडाळकर सरांच्या रूपाने होते. दरवेळी आमचा संवाद होत असे, असे नव्हते, मात्र त्यांना सहज भेटून देखील मला प्रेरणादायी वाटत असे. त्यांना आम्ही बाबा म्हणून संबोधत होतो. (खान्देशात बाबा शब्द आजोबा या भावार्थाने वापरला जातो. )

असे आमचे वडाळकर बाबा गेल्याचे ऐकून अत्यंत दु:ख झाले. दोन दिवसांपासून मन बैचेन होऊन त्यांच्याबद्दल सतत विचार करत आहे, आणि त्या विचारांना कुठेतरी व्यक्त करायला वाट व्हावी म्हणून लिहायला घेतले. वडाळकर बाबांशी माझी ओळख तशी संघाच्या शाखेत झाली. ५ वी - ६ वीत असताना त्यांच्या बालाजी वाड्यात आमची संघाची शाखा भरत असे. लहानपणी खेळाचे, गोष्टींचे ऐकण्याचे आकर्षण असल्यामुळे स्वाभाविक शाखेची ओढ लागली, आणि हळू - हळू मी संघमय कधी झालो कळलेच नाही. त्यात प्रारंभीच्या काळात महत्वाची भूमिका ज्यांनी निभावली अश्या व्यक्तींपैकी ज्येष्ठ नाव होते वडाळकर बाबांचे. दररोज शाखेत येऊन आम्हाला नवनवीन गोष्टी सांगणे, देशभक्तीपर गीत शिकवणे यामाध्यमातून त्यांच्याशी गट्टी जमली ती कायमचीच. त्यानंतर बाबा मला अनेक पुस्तके वाचायला देखील देत. त्यांच्यामुळे वाचनाची देखील ओढ निर्माण झाली. संस्कृतचे उत्तम ज्ञान असलेले बाबा आम्हाला सुभाषित देखील शिकवीत होते, त्यामाध्यमातून कुठेतरी संस्कृत भाषेशी परिचय झाला.

अशा वेगवेगळ्या माध्यमांतून वडाळकर बाबांशी जवळीक होत राहिली. पुढे तळोदा सोडून इंजिनिअरिंगचे शिक्षण बाहेरगावी झाले, त्यानंतर नोकरीनिमित्त देखील बाहेरगावीच असल्यामुळे गावाकडे जाणे-येणे अधून-मधून होत असे. प्रत्येकवेळी काही मित्रांना आणि आप्त स्वकीयांना आवर्जून मी भेटत असतो. त्यात एक महत्वाचे नाव वडाळकर बाबांचे होते. इंजिअरिंग झाल्यामुळे तसेच संघाचे अनेक वर्षांपासून सक्रिय काम करत असल्यामुळे त्यांना माझे खूप कौतुक होते, व ते दरवेळी ते व्यक्त ही करून दाखवत. त्यांच्याकडून मिळणारी शाबासकीची थाप माझ्यासाठी एखाद्या पुरस्कारासमान होती. मधल्याकाळात अभिजित दादा (वडाळकर सरांचे सुपुत्र) यांची अपघातात दृष्टी गेल्यानंतर, प्रौढत्वाच्या कालखंडात देखील त्यांना घराची जबाबदारी पार पाडावी लागली, कुटुंबावर आलेल्या बिकट संकटाच्या काळात देखील खंबीरपणे उभे राहणारे बाबा माझ्यासारख्या अनेक तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरले. संघकामाच्या माध्यमातून कुठल्याही ऍक्टिव्हिटीसाठी आम्हा तरुणांच्या उत्साहाला वाव द्यायला बाबा नेहमीच सकारात्मक असत, आणि त्यांचा, नव्हे! आमचा बालाजी वाडा आमच्यासाठी सदैव खुला असे. तेथे आम्ही अनेक रक्तदान शिबीरं, भारतमाता पूजन, गुरुपूजन, संचलन असे निरनिराळे कार्यक्रम घेतले आहेत. प्रत्येक कार्यक्रमाच्यावेळी बाबा आमच्या पाठीशी असत, विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करत, त्याचबरोबर कार्यक्रमाचा एक मुख्य भाग म्हणून सर्वांमध्ये ज्येष्ठतेचा भाव न मिरवता सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे मिसळून जात. त्यांचे सामान्याप्रमाणे वागणे हेच त्यांचे ‘असामान्यत्व’ दर्शवत असे. अशा आमच्या बाबांचे जाणे माझ्यासाठी अत्यंत वेदनाजनक आहे. पुढच्यावेळी बालाजी वाड्यात गेल्यावर आठवणींतून त्यांना शोधण्याचा प्रयत्न करेन, मात्र शाबासकीची ती मिळणारी थाप आता अनुभवता येणार नाही, याची सल मात्र कायम राहील.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

- हर्षल कंसारा  

Comments

  1. Very true...he was always an inspiration for everyone around him even in family...very lively...we are truly blessed to have met someone so good as him...will miss you a lot Mama...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....