सकलेश्वराचे मंदिर



आज एका खाजगी कामानिमित्त अंबाजोगाई येथे येणे झाले, योगेश्र्वरी देवीचे तीर्थक्षेत्र असलेले अंबाजोगाई गाव तसे खूप प्राचीन आहे, म्हणजे ८ व्या शतकातील चालुक्य साम्राज्यात देखील या नगरीचा उल्लेख आढळतो. गावात हिंडत असताना येथे साधारणतः दीड वर्षांपूर्वी केलेल्या उत्खननात काही मूर्ती सापडल्याचा संदर्भ आला, मग काय, त्या ठिकाणी जाण्याची उत्सुकता निर्माण झाली. माननीय शरदराव हेबाळकर यांनी त्याबद्दल माहिती सांगितली आणि सायंकाळी त्याठिकाणी भेट द्यायला गेलो.

सकलेश्वर महादेवाचे जीर्ण स्वरूपातील हेमाडपंथी मंदिर अंबाजोगाई शहराच्या २ किलोमीटर अंतरावर आहे. साधारणतः बाराव्या शतकातील हे मंदिर यादवांचा राजा जैत्रपाल याची राजधानी अंबाजोगाई असताना, त्या काळात उभारले गेले आहे. मंदिराला भेट दिल्यावर लक्षात येते की, येथे त्याकाळी ४-५ मंदिरांची उभारणी केली असावी, आज तेथे एकच मंदिर त्यांपैकी शिल्लक आहे, बाकी सर्वांचे अवशेष तेवढे शिल्लक राहिले आहेत.


दीड वर्षांपूर्वी एका शेतात काही बांधकाम करण्यासाठी खोदकाम सुरू केले असता स्थानिकांना काही मुर्त्या आढळून आल्या, त्यामुळे इतर ठिकाणीही उत्खनन सुरू केले तर जवळपास छोटी - मोठी ७०-८० शिल्पे गवसली आहेत. यादवकालीन ही शिल्पे आपल्या संपन्न अश्या स्थापत्य कला शास्त्राचा पुरावा देतात, आणि परकीय आक्रमणापासून बचाव करून आपल्या पुढल्या पिढीसाठी हा समृद्ध वसा संवर्धन करण्याचा आपल्या पूर्वजांच्या तळमळीचा ही!

मंदिर जीर्ण स्वरूपात जरी असले तरी देखील तेथे पूजा - अर्चना सुरूच आहे. सकलेश्वराच्या मंदिरात आज योगायोगाने आरतीच्या वेळी उपस्थित राहिल्यामुळे माझ्या हस्तेच पुजाऱ्याने आरती करून घेतली. एका प्राचीन देवतेच्या मंदिरात जाणे झाले, ते केवळ टुरिझम झाले नसून एक अध्यात्मिक दर्शन यानिमित्ताने घडल्याची भावना मनात साठवून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे.


- हर्षल कंसारा

Comments

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....