प्रदीपराव केतकर - प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व


परवा सकाळी नाशिकच्या एका संघ कार्यकर्त्याचा फोन आला, मा. प्रदीपराव केतकर यांचे निधन झाल्याचे कळले. ऐकून खूप वाईट वाटले. गेल्या ३-४ महिन्यांपासून कॅन्सरशी सुरू असलेली झुंज अखेरीस संपुष्टात आली. 

थोडा वेळ शांत चित्ताने विचार केल्यावर त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. अत्यंत प्रेमळ आणि शांत स्वभावाचे प्रदीपराव माझ्यासाठी एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व होते. जळगांवला इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असताना माझी काही हक्काची घरं होती, अर्थात अजूनही आहेत! त्यातील एक घर म्हणजे केतकरांचे! प्रत्येकवेळी भेटीत प्रेमाने विचारपूस करणे, सणवाराला आवर्जून घरी जेवायला बोलावणे, ज्यामुळे घराची, कुटुंबाची कमी जाणवली नाही. अशी काळजी ते नेहमीच घेत, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाशी नाळ जुळली ती कायमचीच! 

प्रदीपराव आयकर विभागात एक अधिकारी होते, अत्यंत कर्तव्यदक्ष व प्रामाणिक, अशीच त्यांची ओळख. आयकर विभागातील लोकांना कितिशा संधी मिळतात, आपली व कुटुंबाची वैयक्तिक प्रगती करण्याची!! परंतु अशा अनेक संधी झुगारून त्यांनी आपली कारकीर्द पार पडली होती, ही त्यांची विशेषता! संघाचा कार्यकर्ता व्यवहारी आयुष्यात कसा असावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. 

काकूंनी त्यांच्याबद्दल सांगितलेला एक किस्सा मला आयुष्यभर आठवण राहणारा आहे. प्रदीपरावांचे नवीन लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच ते १९७५ च्या आणीबाणीत तुरुंगात गेले होते. काकूंच्या मनात अनेक प्रश्न, संसार पुढे कसा चालेल ही काळजी, असे सगळे असतानाही, केवळ आणि केवळ देशात लोकशाहीची पुनर्स्थापना व्हावी, हे उद्दिष्टं ठेवून अनेक संघ कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केला होता, त्यात नुकाच मांडलेला संसार, तरीसुद्धा देशकार्यास प्रथम प्राधान्य देणारे प्रदीपराव प्रेरणेचे मूर्त स्वरूपच होते. मला आठवतं २०१० साली अलाहाबाद उच्च न्यायालाने राम मंदिर वादावर निकाल देण्यापूर्वी संघात काही योजना आखली गेली होती, त्यात वेळप्रसंगी पुन्हा सत्याग्रह करावा, आवश्यकता भासल्यास प्रभू रामचंद्राच्या मंदिर निर्माणासाठी पुन्हा जेलमध्ये जावे, असे ठरले होते, त्यात मा. प्रदीपराव जळगांव जिल्हा संघचालक म्हणून या सत्याग्रहात सहभागी होणार होते, निकालानंतर तशी वेळ आली नाही. मात्र वयाच्या साठीनंतरही पुन्हा एकदा संघर्ष करण्याची त्यांची तयारी होती. 

हे समर्पण, हा त्याग, आणि त्यांचा प्रेमळ व मितभाषी स्वभाव नेहमीच स्मरणात राहील. जळगांव सोडल्यानंतर त्यांची भेट झाली नाही, मात्र फेसबुकच्या माध्यमातून माझ्या विविध गतिविधि आवर्जून ते पाहत असत, प्रत्येकवेळी त्यांच्या शुभेच्छा व आशीर्वाद असायचाच!

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिर:शांती देवो! ओम 🙏

- हर्षल कंसारा 

Comments

Popular posts from this blog

चाँद और सूरज

कोरोनाचा व्हायरस नव्हे, हा तर देवाचा प्रँक....